जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, त्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित देखील झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून चाळीसगावची नवी ओळख आता MH52 अशी असणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांच्या पासिंग व आरटीओ संदर्भातील कामांसाठी सुमारे 120 किलोमीटर दूर जळगाव येथे ये-जा करावी लागत होती. त्यात पूर्ण दिवस प्रवासात जाऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात होता. दुर्दैवाने या प्रवासात अनेकांचे अपघात देखील झाले होते.
चाळीसगाव वासीयांच्या भावनांची दखल घेऊन अखेर आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या त्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन व परिवहन विभागाचे सर्व अधिकारी वर्ग यांचे आमदार मंगेश चव्हाण आभार मानले आहेत.
चाळीसगाव वासीयांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणे, हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे. आपण मला आपल्या सेवेची संधी दिली, त्यामुळेच चाळीसगावच्या हितासाठी काम करता येत आहेत. समस्त चाळीसगाव वासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
-आमदार मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव.