
जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
देशभरात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना शिर्डीत मात्र एका गुन्हेगारीची घटना घडली आहे. ज्या शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात. त्या शिर्डीत देखील गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. सोमवारी १९ फेब्रुवारी शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला. साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील भर बाजारात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत हा साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील बाजारपेठेत उभा होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी वाद घालत सूर्यकांतवर तलवार तसेच चॉपरने हल्ला केला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, हातात तलवार घेऊन बाजार पेठेतून पळणाऱ्या आरोपींचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे.पोलिसांनी तातडीने तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.
या घटनेत सूर्यकांत शशिकांत वाणी (वय २४) हा तरुण गंभीर जखमी असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी निखिल महादेव सोनवणे , आर्यन राजकुमार पाटील , प्रदीप सुनील सोनवणे याला अटक केली आहे.