जळगाव : प्रतिनिधी
६४ कलेची देवता श्री गणरायाचे आज दि ३१ रोजी घरोघरी व सार्वजनिक मंडळात उत्साहात आगमन होत आहे. गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्यासाठी रविवारपासून दिवसभर बाजारपेठेत झुंबड उडणार आहे. लहान-मोठ्या मंडळांनी शनिवारी व रविवारी सुटीची संधी साधत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशमूर्ती आणल्या. घरोघरी बुधवारी (३१ ऑगस्ट) रोजी गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. पुढील १० दिवस शहरात गणेशोत्सवाचा उत्साह राहणार आहे. तर दुसरीकडे शहराच्या कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आता पुढील दहा दिवस पोलीसदादा मात्र दिवस रात्र कर्तव्य बजाविणार आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बैठका मागील सप्ताहात पार पडली आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जळगावकरांनी उत्साहात तयारी केली आहे. सोसायटी आणि लहान-मोठ्या मंडळांनी गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी रविवारीपासून तुफान गर्दी केली. पावसाचे वातावरण असल्यामुळे नागरिक सकाळी बाजारपेठेत आले. शहरातील मुख्य बाजारपेठेत जुने बस स्थानक, गोलाणी मार्केट तसेच गणेश कॉलनी, महाबळ परिसर या सारख्या छोट्या मोठ्या परिसरात खरेदीचा उत्साह होता.
गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य आणि प्रसादाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली. मंडळांनी आपल्या आर्थिक नियोजनानुसार मूर्तीची निवड केली. तुलनेने शाडू मातीच्या मूर्तींची किंमत अधिक असल्याने बहुतेक मंडळांनी ‘पीओपी’च्या मूर्ती खरेदी केल्या. मोठ्या मूर्तींना ट्रॅक्टरवर ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत वाद्य पथक सहभागी झाले होते.
गणेशोत्सवाच्या खरेदीने बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. विशेष म्हणजे यावर्षी गणेशोत्सव १० दिवस चालणार आहे. आज ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी असून, अनंत चतुर्दशी ९ सप्टेबर रोजी शहरातून भव्य मिरवणूक यंदा होणार आहे.
बाजारात आकर्षक गणेश मूर्ती
शहरातील अंजिठा चौफुली, नेरी नका परिसर, जुने बस स्थानक, चित्रा चौक, फुले मार्केट परिसर, बळीराम पेठ, गोलाणी मार्केट, गणेश कॉलोनी, महाबळ परिसर, प्रभात चौक तसेच छोट्या मोठ्या परिसरात आकर्षक गणेश मूर्ती आलेल्या आहे. तरी नागरिकांनी धावपळ न करता शांततेत गणेशमूर्ती खरेदी कराव्या.