जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्नामुळे अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात गोरेगाव या गावात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर या आईने आपल्या दोन मुलींसह मृत्यूला कवटाळले आहे. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे.
वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता. या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला त्यानंतर वेगाने सूत्रे हलली पण रीना आपल्या दोन मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या.
गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते पहिल्या पतीपासून एक मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली रीना यांना होत्या मात्र रीना या आर्थिक संकटात त्या सापडल्या होत्या. मुलींचं शिक्षण, खोलीचे भाडं या सगळ्यामुळे रीना हतबल झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.