जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील तस्मिरा परवेझ सय्यद (वय ७ वर्षे) या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आलेल्या नातेवाईकांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात डुप्लेक्स योजनेंतर्गत आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या सात वर्षीय बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.
काही वेळाने सर्व लहान मुले बांधकामाच्या ठिकाणी, वाळूवर खेळत असताना त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी काही जण गेले असता त्यांना भरलेला सेप्टीक टँक दिसला. त्यावर पाठ्यांनी झाकण्यास सुरवात केली असता टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने डोकावले. त्यावेळी ही बालिका आढळली. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह जळगावला आले होते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या आक्रोशाने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.