जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील यात्रेत तमाशा पाहण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा येथील तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदरखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे पेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता. तर हा तमाशा पाहण्यासाठी आलेला सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (वय ३०) हा युवक आला होता. या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रोजी तमाशा जेथे सुरु होता, तेथून काही अंतरावर सकाळी आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृत मनोज निकम यांचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली. त्यानंतर लागलीच पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील व मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर मनोज निकम यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह पुढील चौकशीसाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतु तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात विविध चर्चाना उधाण आले आहे.