जळगाव : प्रतिनिधी
शहरातील समता नगरातील तरूण गणपती विसर्जनासाठी कांताई बंधाऱ्यावर गेला होता यावेळी या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, समता नगरातील रहिवासी असलेल्या भगवान नामदेव राठोड(वय १८) हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदिवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणासांबत भगवान देखील पाण्यात उतरला. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न असल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला. यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली परंतू तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मयताच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिण असा परिवार आहे.