धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पष्टाणे येथील घरफोडी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून त्यानुसार साडेचार लाखांचे दागिने आणि ४५ हजाराची रोकड असा एकूण तब्बल ५ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. दरम्यान, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील पष्टाणे कल्याणे होळ गावात बंद घरे फोडली होती.
तालुक्यातील पष्टाणे कल्याणे होळ गावात बंद घरे फोडल्याप्रकरणी दि.७ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार भूषण दिलीपराव देसले (वय ३३ धंदा खाजगी नोकरी रा.पष्टाणे ता.धरणगाव) यांच्या घरातून चोरट्यांनी एकूण २ लाख ६५ हजराचा ऐवज लंपास केला होता. तर त्याच दिवशी कल्याणे होळ गावातील वर्षाबाई वनसिंग पाटील (वय ४६, व्यवसाय – शेती रा.कल्याण होल ता.धरणगाव) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ४६ हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते.
आता या प्रकरणी अनिल वना पाटील यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ सप्टेंबरची रात्री ९ ते ७ सप्टेंबरच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने अनिल पाटील यांचे बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने आणि ४५ हजार रुपयाची रोकड असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी देखील अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. राहुल खताळ हे करीत आहेत. दरम्यान, तिघं घरांमधून ८ लाख १६ हजाराचा ऐवजवर चोरट्यांनी एकाच दिवसात साफ केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चोरट्यांनी रेकीकरून किंवा माहितगार व्यक्तीच्या मदतीने चोऱ्या केल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.