जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२३
राज्यात गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय शांततेत पार पडल्यानंतर पुण्यातील सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावर माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय ढुमे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे वडिल पिंपरी-चिंचवडमध्ये सहायक उपनिरीक्षक होते. निवृत्त झाल्यानंतर काही वर्षापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विजयचे अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी मैत्रीचे संबंध होते तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. काही वेळात विजय ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
सिंहगड रोड पोलिस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजण यांनी सांगितले की, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोर किती होते ? याची माहिती घेतली जात आहे. आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत.