जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली असताना महाराष्ट्र आणखी काँग्रेसला मोठ भगदाड पडले आहे. काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली असून, नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काय म्हणाले राजीनाम्यात?
मी दिनांक 12/02/2024 रोजी मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केलेल्या आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात म्हटले आहे. या पत्रावर अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयाबाहेर मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा केला जात आहे. अशोक चव्हाण भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.