नंदुरबार : वृत्तसंस्था
एका महिलेने आपल्या आजारी पतीवर उपचार करण्यासाठी चक्क आपल्या ६ वर्षाच्या मुलाला ५० हजारात १ वर्षासाठी मेंढ्या चारण्यासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारात उघड झाला आहे. याप्रकरणी मुलास विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली.
काय आहे घटना
नंदुरबार येथील आरटीओ कार्यालयासमोर ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक ६ वर्षांचा मुलगा रडत होता. रस्त्याने जात असलेल्या एका नागरिकाने त्याला रडण्याचे कारण विचारले असता मला वडिलांशी मोबाइलवर बोलायचे आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन बोलणे करून द्या, अशी विनंती त्याने केली. मात्र, त्या मुलाला वडिलांचा मोबाईल क्रमांक सांगता आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांशी संपर्क होऊ शकला नाही. या वेळी मुलाने मला मारुती याने भोणे (ता.नंदुरबार) येथील गुंडा नागो ठोलारीस ५० हजारात विक्री केले आहे. मला मेंढ्या चारायला लावतात, अशी रडत आपबीती कथन केली. त्यावरून पोलिसांनी मारुती व गुंडा ठेलारी यांना अटक केली.
पती आजारी असल्याने आईने गुंडा ठेलारीकडून ५० हजार रुपये घेतले. त्या मोबदल्यात वर्षभर मेंढपाळ म्हणून काम करवून घ्या, असे सांगितल्याचे तपासात समोर आले मुलाचे वडील खरोखर आजारी आहेत का? की आणखी कोणत्या कारणासाठी त्या मुलाला विक्री केले, याचा तपास सुरू आहे.