अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे तहसील कचेरीवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सतत ४२ दिवसांचा पावसाचा खंड पडूनही अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, २०२१ मधील अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्यात यावी, महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचे ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह मोर्चा काढला. मोर्चा मंगलमूर्ती चौक, न्यायालय, महाराणा प्रताप चौकमार्गे तहसील कचेरीवर पोहोचला, तहसील कार्यालयाबाहेर जनआक्रोश करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे प्रा. सुभाष पाटील यांनी आरोप केला की, नागपूर कार्यालयातील ट्रिगर टू अहवाल पाठवण्यात आला. त्यात फक्त भाजप आमदार, मंत्री व मोजक्या प्रभावित नेत्यांच्या मतदारसंघातच दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.
अमळनेर तालुक्यात सर्वाधिक पीकविमा मिळाला म्हणजे जास्त नुकसान झाले आहे, यावरून दुष्काळाची दाहकता दिसून येते. मंत्री असूनही अमळनेर तालुका वगळण्यात आला, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी कार्यालयाबाहेर निवेदन स्वीकारले, मोर्चात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, डॉ. अनिल शिंदे, तिलोत्तमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, उमेश पाटील, श्याम पाटील, धनगर पाटील सहभागी झाले होते.