जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
एक वेळ तुम्हाला शालेय व महाविद्यालयीन जीवनात अपयश आले तरी चालेल मात्र आयुष्यात असं कोणतंच काम करु नका की, ज्याने आई – बापाला खाली मान घालून समाजात वावरावे लागेल. जीवनात चांगले काम करायला शिका. आई – बाप हेच आपले तिरुपती असून तेच आपले साईबाबा आहेत. त्यांची सेवा हीच आपली श्रीमंती असून चारित्र्यवान माणूस घडविण्यासाठी आई – वडिलांचे कष्ट सतत स्मरावे असे प्रेरणादायी प्रतिपादन युथ स्पीकर, समाज प्रबोधनकार, लाईफ कोच व छत्रपती पुरस्कार विजेते प्रा. वसंत हंकारे यांनी पाळधी येथील भाऊसो गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित “नाते लेकीचे आणि माता पित्यांचे ” – आजची सामाजिक गरज या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. एस. एस. चे उपाध्यक्ष डी. एम. महाजन होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी.पी.एस. ग्रुपचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या “नाते लेकीचे आणि माता – पित्यांचे ” आजची सामाजिक गरज या अभिनव उपक्रमाबद्दल आर. एस. एस. चे उपाध्यक्ष डी. एम. महाजन व मान्यवरांनी कौतुक केले. तसेच या आदर्श उपक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व जीपीएस मित्र परिवाराचे यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जी.पी. एस.चे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जी.पी.एस मित्र परिवाराने राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती विषद केली. केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रुचिता पाटील यांनी केले तर आभार जी.पी.एस चे धनराज कासट व प्रशांत झवर यांनी मानले.
यावेळी प्रा. हंकारे म्हणाले की, मुलांनो आई – बापाशिवाय जीवन पुर्ण होत नाही. म्हणून आई-वडीलांना विसरु नका. स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हा , आई – बापाने दिलेल्या जन्माचे चीज करून त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आई-बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. मोबाईल मध्ये आवडणाऱ्या हिरो- हिरोईन यांचे फोटो स्टेटसला ठेवण्यापेक्षा आई-वडीलांचे फोटो स्टेटसला ठेवा, आपल्या पोटाला चिमटा घेऊन, अडचणी सहन करुन तुमची सर्व हौस आई-बाप पुरवत असतात. म्हणून त्यांची फसवणुक करु नका. घर आनंदी तर राष्ट्र आनंदी त्यासाठी घरातील माता आनंदी असली पाहिजे असेही सांगितले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे भावूक झाले होते.
या कार्यक्रमात अनेक उदाहरणे, काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून प्रा. हंकारे यांनी मांडले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनी, बहुसंख्येने आलेला पालकवर्ग, महिला अक्षरशः ढसाढसा रडत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वं मुला-मुलींना डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला लावले त्यानंतर आपल्या बापाला आठवा आणि बाबा मी तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही. समाजापुढे तुम्हाला मान खाली घालून वागावे लागेल असे कृत्य मी कधीच करणार नाही. अशी शपथ प्रा. हंकारे यांनी यावेळी विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींना घ्यायला लावली. मुलींनो, कोणत्याही भूल- थापांना व प्रलोभनांना बळी पडुन, पळुन जाण्याचा प्रयत्न करु नका व आई-वडीलांना दु:ख देऊ नका असाही संदेश प्रा. हंकारे यांनी शेवटी मुलींना दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून आर. एस. एस. चे उपाध्यक्ष प्रा.आर एन महाजन, प्रा. शेलेजा माहेश्वरी, प्रा. उज्वला पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते. भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय व परिसरातील विद्यालयातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.पी.एस. ग्रुप व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.