अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला मराठवाड्यातील धाराशिव येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय युगप्रवर्तक साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक डी. के. शेख यांनी एका पत्राद्वारे केली आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच त्यांना धाराशिव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. रमेश माने यांनी ‘निवडक दहा कथा’, म. सु. पगारे लिखित बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’, संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे. अलीकडेच त्यांनी अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे. शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अक्षरपेरणी’ या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे साहित्य, शिक्षण व विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.