जळगाव मिरर | ६ जुलै २०२३
राज्यातील ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्यासाठी अनेक वर्षापासून लाखो कार्यकर्ते आग्रही असतांना हि युती झालेली नाही पण गेल्या वर्षी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या बंडाने व आता झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडाने पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा जोर धरीत आहे. त्यावर मनसेने देखील युतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘युतीसाठी मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही’ असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फुट पडली त्यानंतर आता मनसेकडून हा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तर दैनिक सामनाच्या कार्यालयात अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्याचबरोबर राऊत आणि पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.