जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून मारहाण व खुनाच्या घटना गेल्या काही वर्षापासून घडत आहे. तर नुकतेच सांगली जिल्ह्यात देखील अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यात मुलाच्या वडिलांचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगले येथे घडली आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील मांगले येथील दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने आणि संबंधित मुलीने पळून जाऊन लग्न केलं होतं. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी पोहोचले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केली. यात दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.