
जळगाव मिरर | १४ जून २०२४
न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देवून जबरी चोरीतील संशयित भोलासिंग जगदिशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुर) हा बुधवारी न्यायालयातून पळून गेला होता. दिवसभर लपून राहिल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो लपत छपत घराकडे जात असतांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी भोलासिंग याच्या वाटेतच मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपुर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या भोलासिंग बावरी याने भंगार विक्रेत्याला मारहाण करीत त्याच्याजवळील तीन हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयित भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा.तांबापुरा) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याला दि. १३ जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. परंतु संशयिताची नंदुरबार येथील कारागृहात रवानगी करायची असल्याने संशयिताला घेवून आलेले पोलिस न्यायालयाकडून मिळणाऱ्या वारंटसाठी न्यायालयाच्या आवारात थांबले होते.
दुपारच्या सुमारास पळून गेलेला भोलासिंग हा दिवसभर सिंधी कॉलनीतील भक्त निवास येथे लपून बसलेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास तो सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराकडे जात असल्याचे एमआयडीसी पोलीसांना दिसले. त्यांनी भोलासिंग याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.
गस्तीवर असलेला कर्मचारी संशयिताला घेवून जाण्यासाठी वाहन पाहण्यासाठी न्यायाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ गेले. यावेळी भोलासिंग याने दुसरे कर्मचारी श्रीराम बोरसे यांना पिण्यासाठी पाणी मागितले. बोरसे हे पाण्याची बॉटल घेण्यासाठी मागे वळताच भोलासिंग बावरी याने त्यांच्या हाताला झटका देवून तो तेथून पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयातून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोलासिंग हा पळून गेल्याचे कळताच अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला त्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पसार झालेल्या भोलासिंग याचा शोध घेत होते. पसार झालेल्या भोलासिंगला अटक केल्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याची नंदुरबार येथे रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, नरेंद्र मोरे विनोद आस्कर यांच्या पथकाने केली.





















