
जळगाव मिरर | २३ जून २०२४
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील पहूर गावातील गजानन राठोड (४०) या तरुणाचा ब्लँकेटमध्ये बांधलेला मृतदेह शुक्रवारी २१ जूनला धामणगाव रेल्वे परिसरातील रेल्वेेमार्गावर आढळला होता. हा खून मृताच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केल्याचे समोर आले. खून केल्यानंतर मारेकऱ्याने एकट्यानेच गजाननचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवरून तब्बल ३६ किलोमीटर आणला व धामणगावातील पुलावरून रेल्वेमार्गावर टाकून पळून गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात गंगा गजानन राठोड (३५, रा. पहूर), सचिन श्रावण राठोड (३०, रा. वीरगव्हाण, तिवसा, अमरावती) यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ वर्षांपूर्वी गंगा आणि गजानन या दांपत्यामध्ये वाद झाले होते. त्या वेळी गंगा तिच्या माहेरी म्हणजेच वीरगव्हाण येथे राहण्यासाठी गेली होती. गंगा आणि सचिन यांच्यात प्रेमसंबंध जुळले. काही महिन्यांनंतर गंगा पुन्हा पती गजाननकडे नांदायला परत गेली. मात्र, सचिनसोबत तिचे संबंध कायम होते. या अनैतिक संबंधांची कुणकुण लागल्याने पती-पत्नीत खटके उडत होते. त्यामुळे अनेकदा पतीचा त्रास असल्याचे गंगा सचिनला सांगत होती. २० जूनला दुपारी गंगाने पुन्हा सचिनला फोन करून गजाननचा त्रास असल्याचे सांगितले व दोघांनी गजाननला संपवण्याचा कट रचला. २० जूनला मध्यरात्री सचिन पहूरला गजाननच्या घरी पोहोचला. तो झोपेत असताना दोघांनी मिळून गजाननचा गळा आवळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
पूर्वनियोजित कट असल्यामुळे सचिनने चादर नेली होती. त्यानंतर मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास सचिनने गजाननचा मृतदेह गंगाच्या मदतीने चादरीत गुंडाळून दुचाकीवर बांधून ३६ किमीवर आणला व पहाटे धामणगाव रेल्वे शहराबाहेरील पुलावरून रेल्वे मार्गावर टाकून दिला. रेल्वे येईल आणि गजाननचा मृतदेह रेल्वे खाली जाईल. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचे समोर येईल, असे गंगा आणि सचिनला वाटले होते. मात्र २१ जूनला सकाळी रेल्वे येण्यापूर्वीच मृतदेह पोलिसांना दिसला व त्यानंतर पोलिसांनी दाेघांना अटक केली.






















