जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
गावातच राहणाऱ्या मामीचे निधन झाल्यामुळे शुक्रवारी त्यांचा दशक्रियेचा कार्यक्रम होता. त्यासाठी ट्रॅक्टरमधून लाकडे घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता नांद्रा गावाजवळ घडली. या अपघातात चालक वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४२, रा. नांद्रा खु.ता. जळगाव) हे ट्रॅक्टर खाली दबून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा खु. येथे वासुदेव गोपीचंद सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. त्यांच्या गावातच राहणाऱ्या त्यांच्या मामींचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. शुक्रवारी त्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम असल्याने लाकडे आणण्यासाठी वासूदेव सपकाळे हे गुरूवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर घेवून शेताकडे गेले होते. लाकूडे भरून असताना त्याठिकाणी असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे वासुदेव सपकाळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी होवून थेट तापी नदीत कोसळले.
ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यामुळे वासुदेव पाटील यांचे डोक स्टेअरींमध्ये अडकले. त्यानंतर नदीपात्रात असलेल्या दगडावर ते आदळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परंतु रुग्णालयात आणत असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
अपघातात मयत झालेल्या वासुदेव सपकाळे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. लाकडे घेण्यासाठी जात असतांना त्यांनी गावातील काही जणांना भेटून ते लाकडे घेण्यसाठी निघाले. परंतु दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घालीत त्यांना हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.