जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन करण्यात येत असतांना याच विसर्जनासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. या दोन घटना गुरुवारी पारोळा व मुक्ताईनगर तालुक्यात घडल्या. मनोज हिरालाल पाटील (५३, रा. पळासखेडे सीम, ता. पारोळा) आणि फिरोज गव्हाणसिंग पवार (२५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पळासखेडे सीम येथे यंदा एक गाव – एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गावातून वाजत-गाजत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पाटचारीजवळ पोहोचली त्यावेळी मनोज पाटील हे पाय घसरून पाटचारीत पडले. तरुणांनी पाटचारीत उड्या मारल्या. परंतु मनोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.
भाऊसाहेब हिलाल पाटील यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरी घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे घडली. फिरोज पवार हा गुरुवारी विसर्जनासाठी सिनफाटा पाझर तलावाकडे गेला होता. त्या वेळी पाय घसरून तो पाण्यात बुडाला. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता त्याचा मृतदेह आढळला. हलखेडा येथील पोलिस पाटील अनेश बनेशबाबू पवार यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यावरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.