जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
जळगाव शहरात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत व मालमत्तेचे नुकसान यासह २० गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २३) व त्याचा साथीदार गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (वय २४, दोघ रा. कांचननगर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश सोमवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर पाऊले उचण्यात आलेली आहे. शहरातील कांचन नगरातील आकाश उर्फ डोया सपकाळे याच्याविरुद्ध शनिपेठ, जिल्हापेठ, तालुका, एरंडोल पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, दुखापत, दुखापत, मारामारी, चोरी, गंभीर शिवीगाळ, दमदाटी, मालमत्तेचे नुकसान असे एकूण २० तर त्यांच्या टोळीने १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. ही टोळी शहरात दहशत पसरवित असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्क कारवाई देखील करण्यात आली. परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे या टोळीच्या प्रमुखासह त्याचा साथीदाराच्या हद्दपारीचा प्रस्ताव शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तयार करुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाचे कामकाज पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोनि रंगनाथ धारबळे, सफौ संजय शेलार, यूनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, अश्विन हडपे, परिष जाधव, पोकों राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, किरण वानखेडे यांच्या पथकाने केली.