जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरातील पोलीस व महसूल विभागात लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार आणि पोलीस हवालदार गणेश वनवे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरारच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ५० लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रकमेतील १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना गणेश वनवे पोलीस कर्मचाऱ्याला बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाला आहे.
या प्रकरणातील फिर्यादीवर आर्थिक शाखेमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच मदत मिळवून देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार याने ५० लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ३५ लाखांवर ठरवण्यात आली. यानंतर फिर्यादीने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयात सापळा लावला होता. लाचेच्या रकमेतील पंधरा लाखांचा पहिला हप्ता घेताना भाईंदर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश वणवे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हा फरार झाला आहे. या प्रकरणात मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.