
जळगाव मिरर | २ जुलै २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजित पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच नसून सख्ख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदार संघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी मंत्री डॉ. सतीश पाटील या पद्धतीचे चुकीचे विधान करत असल्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे की, राजकीय झोपेत असलेल्या सतीश पाटलांना आता वेगवेगळी स्वप्ने पडू लागली आहेत. मी अजित पवारांना सोडून दुसऱ्या पक्षात जाणार हे देखील त्यांना स्वप्नच पडले असावे. लोकसभा निवडणुकीत पुतण्याला निवडून आणू शकले नाहीत, एवढेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या मतदार संघात मताधिक्य मिळवून देऊ न शकल्याने त्यांना वैफल्य येणे साहजिकच आहे. त्यामुळेच राजकीय झोपेमध्ये त्यांची काहीतरी बडबड सुरू झाली आहे. यामुळे माझ्या दृष्टीने त्यांना फारसे महत्व देण्याची गरज वाटत नाही. खरेतर त्यांनाच कंटाळून पक्षातून आ. एकनाथराव खडसे यांच्यासारखी मंडळी बाहेर पडली.
माजी मंत्री गुलाबराब देवकर यांना सतत विरोध, रवींद्र पाटलांना विरोध, ज्या दिवसापासून ते आमदार व मंत्री झालेत, तेव्हापासूनच खरेतर या जिल्ह्यात पक्ष डबघाईला जाण्यास सुरुवात झाल्याने या स्थितीला तेच जवाबदार आहेत. राजकीय झोपेत बडबडणाऱ्या व्यक्तीवर जनता कधीही विश्वास ठेवत नसते. ना. अजित पवार माझे श्रद्धास्थान आहेत. त्यांनी ज्या व्यक्तीची कुठलीही राजकिय पार्श्वभूमी नाही, त्याला थेट राज्य मंत्री मंडळात स्थान दिले, त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर यापुढे अमळनेर मतदार संघात विधानसभेची निवडणूक मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँगेस पार्टीतर्फेच लढवणार असून यात माझ्या राजकीय कारकिर्दीपर्यंत कोणताही बदल होणार नाही, असा ठाम विश्वास ही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.






















