जळगाव मिरर | १२ जुलै २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीचा विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना नुकतेच एका ५३ वर्षाच्या व्यक्तीने आपल्या मित्राच्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी लगट करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पतीच्या ५३ वर्षांच्या आरोपी मित्राला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे कि, तेरा वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत घाटकोपर परिसरात राहते. आरोपी हा तिच्या वडिलांचा मित्र असून त्याचे तिचे घरी नेहमीच येणे-जाणे होते. बुधवारी (दि.10) सकाळी साडेअकरा वाजता ही मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिचा हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर तो तेथून पळून गेला. घडलेला प्रकार नंतर तिच्याकडून तिच्या आईला समजताच तिने पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.