जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३
देशातील अनेक शहरात आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मध्य प्रदेशमधील शाळकरी मुलींना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना बुधवारी सकाळी घडली असून ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहन चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्ताच्या कडेला उभी केली आणि सर्व लहान मुलांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. सध्या सर्व मुलं सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी या बसमध्ये जवळपास १५ विद्यार्थी होते. बसला आग लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांचा जीव कासावीस झाला. आपली मुलं सुखरूप असतील या चिंतेत पालक होते. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेने सर्व विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर काही वेळातच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.