जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
मध्य प्रदेशच्या इंदोर शहरातील कोचिंग संस्थेत नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक शुद्ध हरवल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. सायलंट हार्टअॅटॅकमुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजा लोधी असे विद्यार्थ्यांचे नाव असून, तो सागर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पीडित विद्यार्थी बेशुद्ध होऊन कोसळताना दिसत असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाला आहे. एक विद्यार्थी भोवळ येऊन बाकावर डोके ठेवताना या व्हिडीओत दिसते. इतर विद्यार्थी तत्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करतात. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अभिनय विश्वकर्मा यांनी सांगितले. हृदयाशी निगडित समस्येमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली असून, या प्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती विश्वकर्मा यांनी दिली.
बुधवारी दुपारी राजा लोधीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञ महेंद्र चौरसिया यांनी दिली. पीडित विद्यार्थ्याला ‘ब्रुगाडा सिंड्रोम’ हा आनुवंशिक हृदयाशी संबंधित आजार होता. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती चौरसिया यांनी दिली.