जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच नाशिक शहरात दारू घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले. याचा राग आल्याने चौघांनी मिळून कामगारास मारहाण केल्याची घटना नाशिक- पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील कॅपिटल वाईन शॉपमध्ये घडली. कामगार रवींद्र बहादूर नामदेव यास मारहाण करत दगड मारून जखमी केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील दिपनगर परिसरातील कॅपिटल वाईन शॉपमध्ये रवींद्र विजय बहादूर नामदेव हा युवक कामाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रवींद्र हा दुकानात काम करत असताना चार जण दारू घेण्यास आले. यावेळी रवींद्र याने त्यांना दारूच्या बाटल्या काढून दिल्यानंतर पैसे मागितले. पैसे मागायला इतकी घाई का करतो? असे त्या चौघा युवकांनी बोलल्याने रवींद्र याने काउंटरवर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या पुन्हा दुकानात ठेवून दिल्या. बाटल्या परत उचलून नेल्याने त्याचा राग आल्याने चौघे युवक जबरदस्ती दुकानात घुसले. यानंतर शिवीगाळ करत त्यांनी रवींद्र व त्याच्यासोबत काम करणारा सोनुकुमार कनोजिया यांना मारहाण केली. दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांना दुकानाबाहेर काढून दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.