जळगाव मिरर | २२ जुलै २०२४
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरातील अल्पवयीन मुलीना विविध आमिष देवून पळवून नेल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी परिसरातून आठवीत शिकणाऱ्या मुलीला एकाने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. २ मे रोजी हा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शनिवारी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आमलीबारी परिसरातील १७ वर्षे ७ महिने वय असलेली मुलगी २ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती. दरम्यान, काही दिवसांनी मुलीचा भाऊ आणि आई यांना सोरापाडा येथील एकाने मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी तपास केला असता, संशयिताने लग्नाचे आमिष देत मुलगी पळवून नेल्याचे स्पष्ट झाले होते. यातून शनिवारी सायंकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.