जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना नुकतेच अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर नेवासे फाट्याजवळ भरधाव कार त्रिमूर्ती संकुलाजवळच्या ओढ्यात कठडा तोडून कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री ११ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका मुलीसह ३ महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले छत्रपती संभाजीनगर व आळेफाटा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघातात सुदैवाने एक चिमुकली बचावली. वसीम हारुण मुल्ला (४१), अनसुरा बेगम हारुण मुल्ला (४१, रा. दोघेही रा. मोमीनपुरा, छत्रपती संभाजीनगर), रेश्मा हलदार (३५), हसिना बेगम हारुण पठाण (५४), सामिया हलदार मोमीन हलदार (१४, तिघे रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
मुल्ला कुटुंबीय हे रविवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास स्कोडा कारने एमएच १२ ईटी २७०० आळेफाटा, ता. जुन्नर येथून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मध्यरात्री अकराच्या सुमारास भरधाव कार नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाट्याजवळ पडलेल्या एका टायरला सुरुवातीला धडकली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या शाळेच्या ओढ्यात जाऊन पडली.
या अपघातामध्ये कुटुंबातील पाच जणाांचा बुडून मृत्यू झाला. या अपघातामध्ये सुदैवाने मासुमा हलदार मोमीन हलदार (१३) ही मुलगी बचावली. अपघात झाल्यानंतर ती प्रचंड हादरून गेली होती. त्यानंतर तिला तिच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नेवासे पोलिसांसह नेवासे-फाटा परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी मदत केली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे हारुण अामिर मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.