जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरातून नेहमीच अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असताना आज बीड शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल भरण्यासाठी हा व्यक्ती वेटिंग करत होता. मात्र अचानक तो खाली कोसळला. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचे समजते. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील पोलिस पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती हे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब मिसाळ असे त्यांचे नाव आहे. पेट्रोल भरण्यासाठी ते आले अन् काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. पेट्रोल पंपावरील इतर लोकांना काही समजण्याआधीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते स्कुटीवर पेट्रोल भरण्यासाठी रंगात उभे असल्याचे दिसून येत आहे.
इतक्यातच ते गाडीवरून खाली कोसळतात. आजूबाजूचे लोक त्यांची गाडी उचलून बाजूला करतात. शिवाय त्यांना मिर्गीचा दौरा असल्याचे समजून चप्पलेचा वास देत असल्याचे दिसून येत आहे.पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही काळ पंपावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.