जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२४
राज्यातील पुणे जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे. इथून शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
दरम्यान, पुण्यात अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील भीष अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अगदी आठवडाभरापूर्वी नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रॅंकरने ५ ते ६ वाहनांना धडक दिली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.