
जळगाव मिरर | ६ जानेवारी २०२४
देशभरातील अनेक दाम्पत्यांना मुल होत नसल्याने ते त्रस्त असतात तर राज्यातील काही भागातील आई वडिलांना मुल असल्याने ते कोणत्याही स्तराला जाण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच एका बापाने आपल्या ३ वर्षाच्या बाळाला विकल्याची धक्कादायक घटना राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावात पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या पित्याने आपल्या ३ वर्षाच्या बाळालाच तेलंगणात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल करत तेलंगणा येथून ५ जणांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडबे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेची फिर्याद पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिसांत दिली आहे.
आर्णी तालुक्यातील कोपरा येथील रहिवासी पुष्पा श्रावण देवकर (वय २७) यांचे पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने ३ दिवसांपूर्वी फिर्यादी महिला वर्धा येथे माहेरी निघून गेली होती. गुरुवारी (४ जानेवारी) महिला परत पतीच्या घरी आली. यावेळी तिला आपले बाळ दिसून आले नाही. दिवसभर ती बाळाचा शोधाशोध घेत राहिली. अखेर रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास आपल्या बाळाला पतीनेच विकले असल्याची माहिती फिर्यादी महिलेला मिळाली. यानंतर संबंधित महिलेने तत्काळ आर्णी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.
त्यांनी तत्काळ आपले पथक पाठवून तिच्या पतीला पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने ३ वर्षीय बाळाला तेलंगणात विकल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तेलंगणा येथील निर्मल गाव गाठून बाळाची सुटका केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.