जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदाच्या मैदानात अनेक ठिकाणी चुरशीचे सामने होवू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये व उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव अपक्ष लढणार असून त्यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव निवडणूक लढणार आहेत. बायकोलाच आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन जाधव बोलताना म्हणाले, आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिले. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठीमागे रावसाहेब दानवे आहेत. माझे घर फोडले आणि आता माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचे काम झाले, याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे व भाजप पक्षावर केली आहे.
पुढे बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरले नाही. मी आणि माझी आई दोघेच उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे, असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच भाजप पक्षाने त्यांची पत्नी संजना जाधव यांना याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी असा सामना रंगणार आहे. याशिवाय कन्नड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उदयसिंह राजपूत विद्यमान आमदार आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.