जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४
बंदिश ‘सांवरे सलोने से लागे मोरे नैन”, “माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी” या अभंगाने शास्त्रीय गायन मैफिलीत स्वरांची अनुभूती जळगावकरांनी घेतली. सोबतच रागा फ्युजन बँडने शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकात मिश्रण करित सादर करून अभिजात संगीताच्या आविष्काराचा आगळावेगळा आनंद रसिकांना कलावंतांनी करून दिला.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, होस्टिंग ड्युटी, प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची ‘नादातून या नाद निर्मितो…श्रीराम जय राम..’ ही संकल्पना आहे.
प्रतिष्ठानचे विश्वस्त व उपाध्यक्ष दीपिका चांदोरकरांचे वडील यांचे निधन झाले त्यानिमित्त श्रध्दांजली वाहण्यात आली. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. सुत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले.
सौ. मधुमती जैन, डॉ. शिल्पा बेंडाळे, रेडिओ सिटीचे अनदान देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे सी. एस. नाईक, डॉ. योगेश टेनी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, ॲड. सुशील अत्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलावंताचे स्वागत करण्यात आले.
*शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची मेजवानी*
पंडिता रोंकिणी गुप्ता यांनी राग बिहाग मध्ये बडा ख्याल “कैसे सुख सोये शाम मूरत चित चधी” हा विलंबित एकतालात निबद्ध ख्यालाचे शास्त्रीय गायनाची सुरवात केली. तदनंतर छोटा ख्याल एकताला निबद्ध होता बोल होते “पनघटवा सानवार श्याम” ही बंदिश रोंकिणीने तींतलाठी गायली. त्यानंतर राग झिंझोटी मधील मधली रूपक बंदिश “सजरिया सुनी” ही बंदिश तर द्रुत तिनतालात “सांवरे सलोने से लागे मोरे नैन” ही बंदिश सादर केली. त्यानंतर “माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी” या अभंगाने आपल्या मैफिलीची सांगता केली. रोंकिणीला तबल्याची साथ आशिष राघवानी यांनी दिली. तर संवादिनीवर साथ दीपक मराठे यांनी केले. ताणपुरावर अनघा गोडबोले व रश्मी कुरमभट्टी यांनी साथ संगत दिली.
*सांगितिक आविष्काराची अनुभूती…*
रागा फ्युजन बँडच्या माध्यमातून सांगितिक अविष्काराची एक वेगळीच अनुभूती रसिकांना बालगंधर्व महोत्सवात घेता आली. सप्तसूराप्रमाणे सप्त कलावंत एकत्रितरित्या हा आविष्कार बालगंधर्व महोत्सवात करून दाखविला. राग हंस ध्वनी ने रागा फ्युजन बँडची सुरवात झाली. शास्त्रीय गायनातील पारंपारिक बंदिशींना अत्याधुनिक संगीत साधनांची जोड नविन रूपाने सादरिकरण केले. यात बाॕडीवूड मधील अहिर भैरव रागातील ‘अलबेला सजन हे गीत व पुरीया धनाश्री रागातील ‘हाय रामा ये क्या हुआ’ हे गीत प्रस्तुत केले. घनन घनन घिर आये…या गिताला वाद्याच्या माध्यमातून व स्वरचित बोलांच्या साथीने नविन वास्तविक परिस्थिती रसिकांसमोर उभी केली. तालवादक जयंत पटनाईकने संपूर्ण बँड ला एका ताल सूत्रात बांधून ताला मधील नाविन्य आणि अभिजात संगीतातील तालबद्धता याच्या मिश्रणातून जयंत ने रसिकांना खिळवून ठेवले. हर्षित शंकरच्या बासरी वादनाने रसिकांना निर्मळ स्वरांची बांधणी रागा फ्युजन बँडमधून अनुभवता आली. अमृतांशु दत्ता स्लाईड गिटार वादनातुन क्लिष्ट राग किंवा बंदीशी, रागांची सुरावट आणि त्याबरोबर जाणारे संगीत लिलया फ्युजन मध्ये सादरीकरण करून रसिकांना वेगवेगळ्या ध्वनी लहरींची अनुभूती देतात. गायक अजय तिवारी यांच्या प्रभाव पूर्वक सादरीकरणाने रसिक भारावून गेले.