जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात एका नावाने मोठी खळबळ माजविली होती. ते नाव म्हणजे गुंड महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता हा नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आलेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात असून, या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली.
त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाची सादर करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत 2016 पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. संबंधित ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कुत्ता 2016 पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई 2020 मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.