जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
भुसावळ शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महेश नगर भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती.
पोलिसांनी पाळत ठेवून गोपनीयपणे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर रविवार, दि.३ मार्च रोजी धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली तर दाम्पत्याला अटक केली आहे. विशाल शांताराम बहाटे व पल्लवी विशाल बहाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक बडे शौकीन ग्राहक दाम्पत्याच्या संपर्कात होते शिवाय त्यांचे फोनवर संभाषण व चॅटींग झाल्याचे समजते. पोलीस आता कुणा-कुणावर कारवाई करतात ? याकडे लक्ष लागले आहे.
ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, शिपाई अश्विनी जोगी आदींच्या पथकाने केली.