जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव कीर्ती बट्ट असून क्रूर पित्याचे नाव विजय बट्ट आहे. हा धक्कादायक प्रकार १५ दिवसांनंतर समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारे विजय बट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रातीच्या दिवशीच कोल्ड्रिंगमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
विजय बट्ट यांनी संक्रातीच्या दिवशी मुलगा कीर्ती बट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी नेले व कोल्ड्रिंगमध्ये सोडीयम नायट्रेंटची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले. १५ दिवसांपुर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. अखेर १५ दिवसांनी आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. स्वतः मुलाच्या वडिलांनेच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.