जळगाव मिरर | १५ जुलै २०२४
रविवारी दुपारी २.३०च्या सुमारास नाशिक-मुंबई रस्ते वाहिनीवरील नवीन कसारा घाटात भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह ५ गाड्यांचा विचित्र अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णवाहिकांमधून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मुंबई-नाशिक महामार्गाच्या मुंबई वाहिनीवरील नवीन कसारा घाटात एका भरधाव मोठ्या कंटेनर वाहनाने समोर चालणाऱ्या ५ गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात मारुती सियाझ, युंदाई, किया, मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्ट या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. लोखंडी खांब घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवीन कसारा घाटातील तीव्र उतार वळणावर असलेल्या धबधबा पॉइंटच्या अलीकडे हा अपघात घडला. कसारा पोलीस, महामार्ग पोलिसांच्या मदतीने तत्काळ जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका आणि घोटी टोलनाका रुग्णवाहिकेने विविध रुग्णालयांत हलवण्यात आले.
खुशबु पेठा, जितेन पिटाडिया, फाल्गुनी पिटाडिया, विनीत मेहता, दिव्या मेहता, प्रमीत सी, हिनल, उज्वला कोडापे, विवेक कोडापे या जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यापैकी गंभीर दुखापत असलेल्या २ रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात १२ ते १३ जण जखमी असण्याची शक्यता कसारा पोलिसांकडून वर्तवण्यात आली. रविवार असल्याने या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती. दैवबलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.