जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या चारशे फूट खोल उंट दरीत शनिवारी (दि.९) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या पिकअप टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप टेम्पो चालकासह ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटीहून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भाजीपाला घेऊन मुंबईकडे निघालेला पिकअप टेम्पो (एम एच १५ जे. सी. ८५३६) कसारा घाटातून जात असताना घाटनदेवी मंदिरासमोरील उंट दरीसमोर वाहनचालक विकी तांबे याला अज्ञात वाहनाने कट मारला. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट उंट दरीच्या कठड्याला धडकला. परंतु, कथडे कालबाह्य आणि जीर्ण झालेले असल्याने आणि पिकअप टेम्पो वाहन वेगात असल्यो टेम्पो कथडे तोडून चालकासह ४०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सुनील खताळ यांनी घटनास्थळी धाव घेत इगतपुरी व कसारा पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची खात्री करून कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकालाही घटनेची माहिती देत मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने चालकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढून श्ववविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान अति धोकादायक दरीत उतरून अपघात झालेल्या पिकअप चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शहापूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश तडवी यांनी पोलीस पथक व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले.