जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२४
नाशिकसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे यासह ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रवी उर्फ माया महादेव तायडे (वय २५, रा. मुक्ताईनगर) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले. त्यानंतर माया याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनेक सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानबद्धतेसह हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मुक्ताईनगर येथील रवी उर्फ माया तायडे याच्यावर भुसावळ बाजारपेठ, शहर, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर तो प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावर स्वाक्षरी केली. त्यानुसार संशयिताला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील आणखी काही रेकॉर्डवरील गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत.
या पथकाची कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख ईब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील यांनी पाहिले.