जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२३
राज्यातील सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २५ वर्षीय तरुणीचे लग्नाच्या दिवशी सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. हातावर मेहंदी आणि अंगावर हळद लागलेल्या सालिया महिबूब शेख (वय २५) या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेलिंग करून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या नवरदेवाकडे खोटी अश्लिल छायाचित्रे पाठवून लग्न मोडण्यास भाग पाडल्याने वैफल्यग्रस्त होऊन नववधूने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संबंधित तिघा तरुणांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुर्दैवी मृत तरुणीने तीन दिवसांपूर्वीच पोलिसांकडे केली होती.
परंतु कारवाई झाली नाही आणि इकडे त्या तरुणांचा त्रास वाढला आणि लग्नही मोडल्यामुळे नववधूने टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले. कुमठे गावातील ओम नमःशिवाय नगरात पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुमठे परिसर हादरला आहे. या घटनेने शेख कुटुंबीय व नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे. संबंधित तिघा तरुणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत नववधू मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा उद्विग्न झालेल्या शेख कुटुंबीयांनी घेतला होता.