जळगाव मिरर | २० जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी येथील महामार्गावर देखील असाच एक अपघात घडल्याची घटना घडली आहे. अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या जमावाला भरधाव ट्रकने उडवले. यात चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका महिलेसह लहान मुलगा आणि दोन ज्येष्ठ नागरिक ठार झाले. तर ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आणि चालक ट्रक सोडून निघून गेला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये शीतल योगेश दाते (३०) व मुलगा रियांश योगेश दाते (५, दोघे रा. आणे) तसेच दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (६२, रा. गुळुंचवाडी) हे तिघे जागीच ठार झाले, तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (८०, रा. गुळुंचवाडी) हे उपचारादरम्यान मयत झाले. कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथील बाबजी भांबेरे यांचे निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. अंत्यविधी कार्यक्रम उरकून नागरिक कल्याण-नगर रस्त्याने जात असताना साडेअकराच्या सुमारास नगरमार्गे भरधाव वेगाने आलेला ट्रक रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देत जमावात घुसला आणि आठ ते दहा नागरिकांना उडवले. या अपघातात रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा आणि अंत्यविधीतील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.