जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात नवजात बालक बेवारस अवस्थेत आढळून येत असल्याच्या घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात एका महिलेनं बाळासाठी औषध आणायला जाते, असं सांगून आपलं बाळ दुसऱ्या महिलेकडे सोपवलं. बराच वेळ झाला, परंतु बाळाची आई परतली नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा ती पसार झाल्याचं लक्षात आलं या संदर्भात पोलीस ठाण्यात आणि महिला बालकल्याण विभागात तक्रार देण्यात आली आहे. बाळ सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलीय. आता पोलीस बाळाला सोडून फरार झालेल्या आईचा शोध घेत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात वार्ड क्रमांक २७ जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधून एक महिला बसली होती. तिच्याकडे आठ महिन्यांचं बाळ होतं. दरम्यान, तिने शेजारील औषधं आणण्याच्या बहाण्यानं शेजारील महिलेकडे बाळ सोपवलं. माझ्या बाळाला सांभाळा, औषधं घेऊन लगेच येते, असं सांगून ती बाळाला सोडून गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. त्यामुळं संबंधित महिलेनं इतरांच्या मदतीनं वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठलं अन् घडलेला सर्व प्रकार सांगितला.
या घटनेनंतर स्थानिक डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनानं रुग्णालय परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये बाळाची आई त्याला संबंधित महिलेकडे देऊन जातअसल्याचं दिसत आहे. परंतु तिने ओळख लपवण्यासाठी चेहऱ्याला स्कार्फ बांधला होता. लवकरच या महिलेचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. घाटी रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.