जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल लांबवल्याची घटना दि. १७ रोजी घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांकडून गस्त सुरु असतांना संशयित फैजल उर्फ मोर्गेम्बो इब्राहीम तांबोळी (वय २३, रा. मालेगाव, जि. नाशिक) हा पळून जात होता. पथकाने त्याचा पाठलाग करीत जेरबंद केले.
पंजाब राज्यातील अमृतसर येथील विशाल विजय चढ़ा हे दि. १७ रोजी सकाळी धुळे जाण्यासाठी जळगाव येथील नवीन बस स्थानकावर आले होते बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून चोरट्याने अॅपल कंपनीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाकडन चोरट्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान, संशयित बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्याठिकाणी गेले, संशयास्पदरित्या फिरत असलेल्या फैजल उर्फ मोर्गेम्बो तांबोळी याच्यावर पोलिसांची नजर गेल्याने तो तेथून पळून जात होता. याचवेळी पथकाने त्याचा पाठलाग करीत स्वातंत्र्य चौकात त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडन चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर फैजल हा मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, मिलींद सोनवणे, पोना जुबेर तडवी अमितकुमार मराठे, रविंद्र साबळे, रविंद्र मराठे, प्रमोद पाटील, नरेश सोनवणे, प्रवीण जाधव यांच्या पथकाने केली.