जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२३
जगभरातील अनेक लोक सोशल मिडीयावर सातत्याने सक्रीय असतात, त्यातून अनेकांना मित्र व मैत्रिणी देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळत असतात पण आता तुमच्या मैत्रीत दुरावा निर्माण होवू शकतो कारण आता मेटा कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसात फेसबुक आणि इन्स्टाग्राम यामधील क्रॉस-अॅप कम्युनिकेशन बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच आता जसं इन्स्टाग्रामवरुन फेसबुकवर किंवा फेसबुकवरुन इन्स्टावर मेसेज करता येतात, ते लवकरच बंद होणार आहे. डिसेंबरच्या मध्यापासून हा बदल लागू होऊ शकतो असं माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे. मेटाने असा निर्णय घेण्याचं कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही.
आता फेसबुक यूजर्स इन्स्टाग्रामवर थेट मेसेज पाठवू शकणार नसले, तरी यापूर्वी दोन्ही अॅप्सवर मिळून केलेली चॅट सुरक्षित राहणार आहे. आधीचं चॅट डिलीट होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र, इथून पुढे जर एखाद्या इन्स्टाग्राम यूजरला फेसबुक यूजरशी चॅट करायचं आहे, तर त्याला मेसेंजवर येणं भाग असणार आहे.
2020 साली मेटाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग सुरू करण्यात आलं होतं. यामुळे मेसेंजरवरुन इन्स्टाग्राम हँडल्सना मेसेज करता येत होतं. आता कंपनीने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरमुळे आतापर्यंत इन्स्टा रील्स थेट फेसबुक मेसेंजरवर किंवा व्हॉट्सअॅपवर शेअर करता येत होता. आता क्रॉस-मेसेंजिंग बंद झाल्यानंतर असं करता येईल की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.