जळगाव मिरर | २१ जुलै २०२४
राज्यातील अनेक महिला व युवतीची विविध माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटना ताज्या असतांना नुकतेच पुणे शहरातील एका महिलेला फेसबुकवर झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. समाज कल्याण खात्याचा नाशिक येथे उपायुक्त असल्याचे सांगून सोन्याचे दागिने दोन तासात पॉलिश करून देतो असे सांगून महिलेची 12 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार फेसबुकवर अशोक भोसले नाव सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची फेसबुकवर एकाशी ओळख झाली. त्याने अशोक भोसले नाव असल्याचे सांगितले. तो समाज कल्याण खात्याच्या नाशिक येथे उपायुक्त असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. तिच्याशी वारंवार चॅटिंग करून त्याने चांगल्याप्रकारे मैत्री करून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याचेकडील १५ तोळे वजनाचे दागिने त्याने महिलेकडे सदाशिव पेठेत भेट घेऊन दिले. तसेच महिलेचे सोन्याचे दागिने दोन तासात पॉलीश करून दुकानातून आणून देतो असे सांगून तिचे १२ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन गेला. मात्र, दोन तासानंतर देखील तो आला नाही. यानंतर फिर्यादी महिलेने आरोपीने दिलेले दागिने दुकानात जाऊन तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. फरतडे करत आहेत.