जळगाव मिरर | २४ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीचे मोठे सत्र सुरु असून नुकतेच रेल्वे पोलिसांनी एक चोरीतील दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. मुंबई-सांताक्रूझ परिसरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेने घरात चोरी करून तेथून पलायन केले. रेल्वेने पतीसोबत पळून जात असताना संशयित प्रीती खरवार (वय २२) व तिचा पती लकीलाल सेठ (वय २०, दोघेही रा. उत्तरप्रदेश) या दाम्पत्याला भुसावळ पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेल्या पाच लाख रुपये किंमतीच्या रत्नजडीत दोन अंगठ्या काढून दिल्या. ही कारवाई भुसावळ रेल्वे पोलिसांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहात असलेले अरविन गुरविंद्र सिंग (वय ५९) यांच्याकडे संशयित प्रीती खरवार ही महिला मोलकरीण म्हणून कामाला होती. त्या घरातील महिलेच्या हातातील रत्नजडीत अंगठ्या चोरून महिलेने पतीसह पलायन केले होते. हे दोघे चोरटे पटणा एक्स्प्रेसने पळून जात असल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिकारी आर. के. मीना यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार करून रेल्वेमध्ये संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक उपनिरीक्षक दीपक कवळे यांना हे चोरी करणारे दाम्पत्य जनरल डब्यात मिळून आले. त्या दोघांना ताब्यात घेत चौकशीसाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ५ लाखांची हिरे जडीत अंगठीसह अन्य मुद्देमाल काढून दिला.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक के. आर. तरड, एस. उपनिरीक्षक दीपक कावळे, उपनिरीक्षक वसंत महाजन, सुनील सिंग, मनोज कुमार यांच्या पथकाने केली. दोघा संशयितांना सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे, लोटी दातीर यांच्या स्वाधीन करण्यात आले.