जळगाव मिरर | ७ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या मोठ्या घटना उघडकीस येत असतांना एक ‘मृत्यू’चा थराराची घटना समोर आली आहे. एका साडेतीन वर्षाच्या बालकाला सांड पाण्यात फेकल्याची संतापजनक घटना मालेगाव शहरातून समोर आली आहे. या घटनेचा थरार सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तेरा वर्षाच्या विधी संघर्षित बालकाने साडेतीन वर्षाच्या बालकाला साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिलं. पाण्यात पडल्यामुळं नाकातोंडात पाणी जाऊन या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मालेगावमधील दातारनगर भागात घडला आहे. मुलाला पाण्यात फेकून दिल्याची थरारक घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन, असं मृत मुलाचं नाव आहे. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हस्सान त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. तेव्हा या ठिकाणी एक टोपी घातलेला 13 वर्षाचा विधी संघर्षित मुलगा आला. थोडावेळ तिथं थांबला. नंतर त्याने साडेतीन वर्षाच्या हस्सानला उचलून घेतलं आणि सांडपाण्यात फेकून दिलं.
मुलाला पाण्यात फेकल्यानंतर या विधी संघर्षित मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. सांडपाण्यात पडल्यानंतर या साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सिसिटीव्हीच्या आधारे या विधी संघर्षित मुलाचा शोध घेत आहे. साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकल्याने मृत्यू झाल्याचा थरार सिसिटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.