जळगाव मिरर | २४ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असून कोकणात देखील पाऊस सुरु आहे. नुकतेच सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाचे झाड अंगावर कोसळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीच्या तळवडे गावात ही घटना घडली. सायली धुरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती गावातीलच जनता विद्यालयात इयत्ता 12 वीमध्ये शिकत होती. महाविद्यालयातून घरी जात असताना वडाचे झाड अंगावर पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी विद्युत वाहक ताराही जमिनीवर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागूनही तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन व सायलीच्या नातलगांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.