जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
रात्रपाळीसाठी कामावर गेलेला तरुण कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली. सुप्रिम कॉलनी परिसरातील साईनगर येथील रहिवासी गणेश वसंत सोनार (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये मिनाक्षी गोल्ड नावाची चटई कंपनी आहे. या कंपनीमध्ये गणेश वसंत सोनार हा तरुण कामाला होता. रविवारी रात्रपाळी असल्याने रात्रीच्या सुमारास गणेश हा कामावर गेला होता. कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात रात्रीच्या सुमारास गणेश हा बुडाला. रविवारी सकाळच्या सुमारास दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर त्यांना हौदात गणेश हा बुडालेला दिसून आला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने गणेशचा मृतदेह हौदातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांची एकच आक्रोश केला. घटना सीसीटीव्हीत कैद कंपनीत काम करणारा गणेश हा रात्रीच्या सुमारास हौदात बुडतांनाची घटना कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये गणेशला फिट आल्यामुळे तो हौदात बुडतांनाची दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.